Wednesday, March 3, 2010

एका बोक्याची डायरी

एका बोक्याची डायरी

२४ जानेवारी २००७
आज रविवार. सर्वात बिझी दिवस.सकाळी सकाळी तीन ठिकाणी मासे खायला जावं लागलं.खुप धावपळ झाली.'काळ्या'ही लपत छपत मेजवानीला आला होता.मी कधीच पाहिलं होतं त्याला.पण
आज त्याच्याकडे लक्ष द्यायलाही मला वेळ नव्हता.कमीत कमी वेळात जास्तीत जास्त हादडायचं होतं ना ! जेवण मात्र अगदी फर्स्ट-क्लास होतं.पोट तुडुंब भरलं.मग समाधानाने पंजे चाटत पाण्याच्या टाकीवर लवंडलो आणि मस्तपैकी ताणून दिली.पण मध्येच कसल्याशा आवाजाने दचकून जाग आली.डोळे किलकिले करून बघितलं तर पहिल्या मजल्यावरची लठ्ठ बाई 'चुक-चुक' आवाज करून मलाच बोलावत होती.हातात एक अख्खी चपातीही दिसत होती.ही बाई कधी चपातीचा टीचभर तुकडाही खायला घालत नाही आणि आज एक अख्खी चपाती?नक्कीच चार-पाच दिवसांची शिळी असणार ! खुप आग्रह करत होती.पण लक्षच दिलं नाही.बस म्हणावं बोंबलत.कावळेही खाणार नाहीत ती.फुकट्ची झोपमोड मात्र झाली !
२८-०१-०७
आज दिवसाची सुरुवात फारच खराब झाली.नेहमीसारखा फाटकापाशी सकाळची कोवळी उन्हं खात बसलो होतो.एवढयात पाठीमागून अप्पा कुलकर्णी आले आणि कंबरेत एक सणसणीत लाथ
घालून गेले ! वरुन अगदी शांत -सरळ दिसणारी माणसंही किती ' डेंजर' असू शकतात हे आज कळ
०७-०२-०७
आज भल्या पहाटे बासुंदीचा वास नाकात शिरला. उठल्या उठल्या कोणी बासुंदी करायला घेत असेल असं वाटत नव्हतं.पण तरीसुध्दा खात्री करून घ्यावी.म्हणून वासाच्या अनुषंगाने शोध घेत घेत पुढे चाललो होतो तर वाटेत नेमका काळ्याच आडवा आला ! मग काय, गप्पकन मानगूटच धरली त्याची.तसा लागला गयावया करायला.मग आवाज जरा चढवूनच म्हणालो,''ए मच्छर,तुला दहा वेळा सांगितलंय ना मी की हा माझा एरिया आहे.इथे पाऊलसुध्दा टाकायचं नाही. तरीदेखील माझ्याशी पंगा घेतोस.थांब,तुझी धुलाईच करतो आता.'' असं म्हणताच काळ्याने सपशेल लोळणच घेतली पायांवर.मग मी पण थोडा विचार केला.काळ्याच्या धुलाईपेक्षा बासुंदीचा शोध घेणं जास्त महत्त्वाचं होतं.शिवाय काळ्याने स्वतःची हार मान्यही केली होती.म्हणून एक शेवटची वॊर्निंग देऊन त्याला सोडून दिलं.शेपूट खाली पाडून धूम पळाला बिचारा .अरे आपली वटच आहे तशी ! एवढयात मागच्या पायाजवळ काहीतरी जाड,काळसर आणि आणि केसाळ हलल्यासारखं वटलं.केवढयांदा दचकायला झालं ! पण पुढच्याच क्षणी कळलं की ती माझीच फुगलेली शेपूट आहे !!
१४-०२-०७
दुपारी अचानक पाठीला खाज सुटली. थांबता थांबेना.शेवटी बाजूच्या मैदानात जाऊन गडाबडा लोळलो तेव्हा कुठे जरा बरं वाटलं.पण सगळं अंग धुळीनं माखलं.मग कठडयावर बसून निवांतपणे अंग चाटू लागलो.मनात विचार आला,''ही माणसं अंगं साफ न करता वर्षानुवर्ष कशी काय राहतात बुवा !'' वाटलं आताच जावं आणि एकेकाचं अंगं चाटून चाटून स्वच्छ करावं !
२२-०२-०७
जोसेफ अंकल्च्या बंगल्यात गेला आठवडाभर साफसफाई चालू आहे.कुंडलीतलं झाड छान सजवलयं.पांढराशुभ्र कापूस,चमचमत्या चांदण्या आणि छोटयाशा सोनेरी घंटा प्रत्येक फांदीवर लावल्याने ते लहानसं झाड खूप छान दिसतंय. आज बंगल्यात काही अनोळखी माणसंही दिसत्यात.लहान मुलंही आहेत.सगळेजण अगदी आनंदात आहेत.जोसेफ अंकल खूप चांगले आहेत.नेहमी मासे खाऊ घालतात.ते नेहमीच आनंदात राहोत अशी देवाजवळ प्रार्थना केली.तेवढयात दोन छोटीशी मुलं जवळ आली आणि मझ्या डोक्यावरून,शेपटीवरून प्रेमाने हात फिरवू लागली.मीही खूश झालो आणि सुखाने डोळे मिटून घेतले.डोळे उघडले तेव्हा माझ्या गळ्यात एक सोनेरी घंटा लटकत होती !
२३-०२-०७
आज जोसेफ अंकलनी एक 'सॊलीड' डिश खाऊ घातली. खमंग वासाचा,लुसलुशीत पदार्थ होता.रात्री समोरच्या सोसायटीतल्या मनीला विचारलं तेव्हा कुठे कळलं त्याला केक म्हणतात ते ! इतक्यात माझ्या गळ्यातली घंटा तिला दिसली.तशी हसता हसता पुरेवाट झाली तिची ! म्हणते कशी,''आता डोक्यावर एक टोपीही ठेव म्हणजे हुबेहूब 'सांताक्लॊज' दिसशील ! ''आता हा सांताक्लॊज कोण बुवा आणखीन?''मी बावळटासारखा प्रश्न केला !!

ता.क : अप्पा कुलकर्णी केळ्याच्या सालीवरून घसरून पडले.लंगडत लंगडत चालत होते.जगात देव आहे म्हणायचा !!!
२८-२-२००७
पहाटे पहाटे कानात कोणीतरी शीरले काय या भितीने उठलो पाहतो काय शेजारी खोतांचा मुलगा माझ्या कानात केरसूणी घालून मला हाकलत होता.हा मुलगा मला कालपर्यंत दुध आणि पाव खाउ घालून माझेच अंग घुसळून काढायचा तेव्हा माझ्या डोक्यावर प्रश्नचीन्ह आलेलं मी जाणवलेलं कारण यांना इतके उबदार घरे असताना हे इथे गच्चीत का बरे कलंडतात? म्हणून मी हुशार मेघाला व चुणचुणीत मनीला बोलावून आणले तेव्हा मला समजले की आत्ता या मुलांची परीक्षा चालू आहे. घरात त्याची मोठ्ठा आंबाडा घालणारी आणि कुंकूवाचा गोल लावणारी आई तोंडाचा पट्टा चालवत असते.म्हणून अभ्यासाला तो आणि चाळीतली सर्व मुले इथे चटया घेऊन अभ्यासाला येतात.मी आणि मनी उगाचचं पप्याच्या पाठीला अंग घासून त्याचा सदरा मळवत होतो.मघाच्या केरसूणीचा मेघाने चाउन चाउन चांगलाच फडशा पाडला होता.मला डांबिस म्हणणारा दर्श्या आज अभ्यासाच्या नादात दोनदा शेपटीवर पाय देता बचावला.बाकी आपलं जिणं काही या लोकांसारखं तडजोड करण्यात वाया न घालवता मी आजचा दिवस याच्या मांडीवर तर कधी त्याच्या मांडीवर संपवला.दिवस संपता संपता दर्श्याने दोनदा माझा उशी म्हणून वापर केला.म्हणजे त्याला किती मार्क मिळतील हे मी आज सांगू शकीन.
२-३-२००७
काही उंदरांना मी मुद्दामहून अभय दिले आहे.दुष्काळ प्रसंगी असे खाद्य नेहमी उपयोगी पडते.आत्ता माझ्या नाकासमोर माझ्यापेक्षा जास्त आत्मविश्वासाने उभे राहण्याइतकी त्यांची मजल जाते.त्यांची दादागीरी मी अनेक रात्री सहन करूनही गप्प आहे.नाडकर्ण्यांकडचा लठ्ठ उंदीर मी कित्येकदा कंटाळा आला होता किंवा सहानुभुती म्हणून खाल्ला नव्हता.त्याला मी त्याच्या आईच्या पोटात असल्यापासुन पाहत आलोय.दोन दिवाळ्या त्याने नाडकर्ण्यांच्या करंज्या चाखल्या आहेत एव्हाना ! सुरवातीला फारच लपत छपत पाहायचा मला.पण आज हे सर्व भारी पडलं मला.मघाशीच 'काळ्या' त्याला मटकावत मटकावत शांत चीत्ताने चालत जाताना पाहीले आणि पश्चाताप झाला.खोतांकडची घूस लाजून घाबरते म्हणून मी तीच्या वाटेला जायला घाबरतो.बाकी या कावळ्यांनी मात्र उच्छाद मांडलाय नुसता.माझी शेपटी हे खेळण्याचं साहित्य आहे असेच ते समजतात.'काळ्या'मुळे आज नावडती डीश खावी लागली.रोज ज्या प्रमाणे मी मीशा चाटून स्वतःला गावचा सरपंच समजतो तसा आज 'काळ्या' मीशा चाटत होता.आज मी फक्त कौलावर जाउन उद्याचा बंदोबस्त करणार आहे हे कावळ्यांना कोणी सांगीतले कुणास ठाउक ?