Wednesday, March 3, 2010

एक डायरी

जाता जाता ठेवून गेलीस एक डायरी
डायरीला त्या कोरी पाने तिनशे चौसष्ट
आणि एका पानावरती तू लिहीलेली
एक कविता

आजही जेव्हा आडरात्रीला दचकुन उठतो
उशास घेतो तुझी डायरी
आणि झोपतो, स्वप्नांमध्ये
वाचत वाचत
एक कविता
एक कविता
आज अचानक पुन्हा चाळली
कोरी पाने
अन दृष्टीला पडली मळकी
कोरी तारीख
त्यावर केवळ दोनच
ओले सुकले थेंब

आज पुन्हा अन पुन्हा चाळली
कोरी पाने
अन चाळवल्या
जुन्या तारखा
जुन्या तारखा.
कोर्‍या पानावरच्या आडव्या रेषा
उभ्या होतात
समोर... चित्रासारख्या.
एक एक क्षण जिवंत
एक एक रेषा सजीव

हातावरच्या रेषा कधी निरखून नाही पाहिल्या
त्याही तशाच अस्पर्श राहिल्या असत्या
पण ....

जाऊ दे
डायरीतलं पुसता येत नाही
आणि हातावरचं उमटत नाही.
आणि विसरता....?